मिरची च्या जाती
मिरचीच्या भरपूर जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल, कमी बिया आणि घट्ट देठ असलेली मिरचीची जात योग्य असते, तर हिरव्या मिरचीसाठी लांबट, चकाकीयुक्त व आकर्षक हिरवी, फिक्कट हिरवी जात योग्य आहे.
मुसळेवाडी सिलेक्शन :
फळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त.
अग्निरेखा :
फळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे. वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.
फुले ज्योती :
फळे घोसात लागतात व एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी आहे.
संकेश्वरी – 32 :
या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; मात्र साठवणुकीत जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
ब्याडगी :
साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त तर फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे.
ज्वाला :
हिरव्या मिरचीसाठी चांगली असून लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे.
पंत सी-1 :
ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी तीन ते चार सें.मी. इतकी असते. अधिक तिखटपणा आहे.
फुले सई :
झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. मध्यम तिखटपणा, ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे.
हे सुद्धा वाचा – पालक लागवड कशी करावी