शेणखताचा वापर कसा करावा

शेणखताचा वापर कसा करावा

शेणखताचा वापर कसा करावा

 • अनेक शेतकरी शेतात शेणखत सहजपणे मिसळून निवांत राहतात. मात्र शेणखताबरोबरच इतर अन्नद्रव्यांचा देखील वापर करावा लागतो. शेणखत हे जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून काम करते. तर चला जाणून घेऊया त्याबद्दल…!
 • जमिनीची मशागत करताना कुळवणीपूर्वी हेक्‍टरी 5 ते 10 टन शेणखत मिसळावे. फळबागांसाठी एकरी 10 ते 15 टन शेणखत मिसळावे.
 • भाजीपाला रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करून नंतरच बियाणांची पेरणी कारवी.
 • चांगल्या कुजलेल्या शेणखताचे लहान-लहान ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांसारखी जैविक कीडनाशके व जैविक खते 15 दिवसांपर्यंत मिसळून ठेवल्यास अशा जैविक घटकांची वाढ झपाट्याने होते. नंतर असे सर्व ढीग एकत्र करून भाजीपाला पिके, फळबागेत मिसळल्यास चांगला फायदा होतो. शेणखताचा वाढीसाठी उपयोग होतो.
 • टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकासाठी गादीवाफा तयार करण्यापूर्वीच हेक्‍टरी 20 टन शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा आदींसह शेतात मिसळावे. नंतर तयार झालेल्या गादीवाफ्यावर रोपांची लागवड करा.

जमिनीत शेणखत मिसळताना काय काळजी घ्यायला हवी

 • कमी क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असावे. अशा शेणामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या आदी किडींच्या अळी आढळतात. त्याला अनेक शेतकरी “शेणकिडे’ म्हणतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील पिकाला नुकसान पोचवितात.
 • भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा आदी मे महिन्याच्या प्रारंभीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यात घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येतो. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्या.
 • उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमी झाल्यावर शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.
 • मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घालतात. त्यामुळे शेतात पुढील हंगामाच्या पिकाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो.
 • काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या लाकार रिंगणात बसवतात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. कुजणाऱ्या शेणात पिकांना घातक ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात.
 • अनेकदा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्‍यक ठरते.
ऑनलाइन पैसे कमविण्याचा उत्तम आणि विश्वासू मार्ग